प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कारवाई नोंदणीचे आदेशही डावलले
पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत शहरातील तीन फूड ट्रक म्हणजेच मोबाइल कॅन्टिन जप्त करण्यात आले आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. शहरामध्ये दिवसेंदिवस खाद्य पदार्थ विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. शहरामध्ये पादचारी मार्गावर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांबरोबर फूड ट्रक, मोबाइल कॅन्टिनच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. रस्त्यावर होणारे हे अतिक्रमण रोखण्यासाठी अशा अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
गाड्यांमध्ये बदल करुन व्यवसाय करणाऱ्या अनेक चालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नोंदणी न केल्याचे आरटीओच्या पाहणीमध्ये दिसून आले. त्यामुळे कार्यालयाकडून नोंदणी करण्याचे आवाहन करत कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र, अनेक फूड ट्रकचालकांनी नोंदणी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. कारवाईसंदर्भात पोलिसांकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार कार्यालयाने दंडात्मक कारवाई करत 3 वाहने जप्त केली. दरम्यान, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई थांबविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, आता ती सुरू करण्यात आली असून यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मोबाइल कॅन्टिन अथवा फूड ट्रक चालविताना वाहनामध्ये बदल करण्यासाठी अपेक्षित रचनेनुसार आराखडा आणि व्यवसायासाठी परवानगी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आराखड्यानुसार अधिकृत वर्कशॉपमधून करुन घेऊन वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये करणे गरजेचे असल्याची माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.