अंबाबाई मंदिराला अतिक्रमणाचा विळखा

देवस्थान समिती पुढाकार घेत बजाविल्या नोटिसा

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूरातील अंबाबाईच्या मंदिराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. अंबाबाई मंदिर परिसरात सुमारे पाच हजार चौरस फुटमध्ये विविध अतिक्रमणे आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे काढून घेण्याच्या दृष्टीने देवस्थान समितीने पावले उचलचली असून आज त्यांना नोटिसा देण्यात आल्या. यामध्ये 15 दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील देवस्थान समितीच्या 5 हजार चौरस फूट जागेत विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. येत्या 15 दिवसांत संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे अन्यथा कारवाईद्वारे मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची भूमिका आज देवस्थान समितीने जाहीर केली.

पश्‍चिम महाराष्ट्रात देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 3 हजारांपेक्षा अधिक लहान-मोठी मंदिरे येतात. यामध्ये प्रामुख्याने करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर, वाडी रत्नागिरीचे श्री जोतिबा मंदिर, ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिर, श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर यांसह अन्य प्रमुख मंदिरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैक एक प्रमुख शक्तीपीठ करवीर निवासिनी श्री अंबाबाई असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा आणि सुरक्षा मिळणे सुद्धा तितकंच महत्त्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती प्रत्यक्षात कधी अतिक्रमण काढते हे पाहावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.