Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकच्या पुजारी कांकेर आणि मरुडबाकाच्या जंगलात गुरुवारी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तीन जिल्ह्यांतील नक्षलवाद्यांविरोधात सैनिक मोठी कारवाई करत आहेत. गुरुवारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले होते. सकाळी नऊच्या सुमारास दक्षिण विजापूरच्या जंगलात गोळीबार सुरू झाला. अधिका-याने सांगितले की मधूनमधून गोळीबार सुरू आहे, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, तीन जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (DRG) कर्मचारी, CRPF च्या एलिट जंगल वॉरफेअर युनिट CoBRA (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शन) च्या पाच बटालियन आणि CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) ची 229 वी बटालियन या ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत. याआधी 12 जानेवारी रोजी विजापूरच्या माडेड पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच नक्षलवादी ठार झाले होते.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला विजापूर जिल्ह्यात 60 ते 70 किलो वजनाचे स्फोटक यंत्र वापरून एक वाहन उडवले होते, या घटनेत आठ सुरक्षा कर्मचारी ठार झाले होते.