सिद्धेश्‍वर कुरोली येथे महारिंगण सोहळा उत्साहात  

दहा हजार भाविकांची उपस्थिती : कुरोली झाले प्रतिपंढरपूर
वडूज – सिद्धेश्‍वर कुरोली (ता. खटाव) येथील यशवंत हो जयवंत हो आश्रमाच्या मैदानावर झालेल्या महारिंगण सोहळ्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गोल रिंगण पाहण्यासाठी सुमारे 10 हजार भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने अश्‍व, गावोगावच्या दिंड्या, भगव्या पताकांचा डौल यामुळे कुरोली गावाला प्रति पंढरपूरचे स्वरुप आले होते.

सायंकाळी सर्व दिंड्या मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर विश्‍वस्त व मान्यवरांच्या उपस्थितीत “यशवंत हो जयवंत हो’चा गजर करत मंदिरापासून मैदानापर्यंत वाजत-गाजत पालखी आणण्यात आली. त्यानंतर मध्यभागी पालखीचे पूजन व महाआरती झाली. याठिकाणी बाबा भक्त व गावातील युवकांनी वैरणीतील चिपाडे व इतर टाकावू वस्तूपासून विठ्ठलमुर्ती बनविण्यात आली होती. रिंगण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. वाठार (ता. कोरेगाव) येथील सुरज गुजले व कुरोली येथील श्रीकांत पाटोळे यांच्या अश्‍वांनी गोल रिंगण काढले.

वाद्याच्या गजरात अश्‍वांनी आठ ते दहा फेरे मारले. फेरे पूर्ण होत असताना लोकांनी टाळ्यांचा गजर केला. तत्पूर्वी संपूर्ण दिवसभर आश्रम परिसरात येणाऱ्या भाविकांना देवस्थानच्यावतीने चहा प्रसाद व अन्नदानाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी यशवंतबाबांच्या हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. दरम्यान महारिंगण सोहळ्याआधी आश्रमात सलग आठ दिवस भजन, किर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरु होते. यामध्ये मधुकर दिक्षीत मसूर, अभिषेक जोशी कुरोली, प्रियांका कदम विसापूर, कमलाकर भादुले, संस्थान महाराज मानेवाडी, निमसोड यांची किर्तने तर बजरंग महाराज दिवडी, हेमंत गोडसे वडूज, प. ना. लोहार, कलेढोण, हणमंत पवार विटा, यांच्या प्रवचनास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या कालावधीत जनार्दन मोरे निमसोड, सुरेश मोकाशी मसूर, राऊत बंधू भिकू पाटील, द्रौपदी पवार, दिलीप इरळे, गौरव आगवेकर, डॉ. अजित देसाई, बाबुराव माने मायणी, सुभाष जाधव ना. वाडी, मुरलीधर भादुले निमसोड यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले. महारिंगण सोहळ्यानंतर रात्री ह.भ.प. विजय शिंदे लोणीकर यांचे बाबांच्या जीवनचरित्रावर कीर्तन व फुलांचा कार्यक्रम झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.