गानगोम बाला देवी, हे नाव काही दिवसांपूर्वी जर उच्चारले असते तर कोणाला काहीही लक्षात आले नसते. भारतीय क्रीडाक्षेत्राशी या नावाचा काय संबंध असाही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असता. मात्र, बाला देवीच्या रूपाने खुद्द इंग्लंडमधील व्यावसायिक फुटबॉल क्लब असलेल्या रेंजर्स संघाने तिच्याशी करार केला व अनेकांच्या भुवया उंचावल्या.
परदेशातील क्लबशी करारबद्ध होणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू अशी सार्थ ओळख तिने निर्माण केली. स्कॉटलंडमधील रेंजर्स फुटबॉल क्लबशी ती करारबद्ध झाली आहे. 29 वर्षीय बाला देवी हिच्याशी या क्लबने दीड वर्षांचा करार केला आहे. ज्या वेगाने महिला फुटबॉलची प्रगती होत आहे, त्या वेगाने आणखीही काही महिला फुटबॉलपटू युरोपातील विविध क्लबशी करारबद्ध होतील. त्यामुळे अर्थातच राष्ट्रीय संघाचा दर्जा उंचावेल. युरोपियन क्लबच्या फुटबॉल स्पर्धा मोबाइल तसेच थेट प्रक्षेपणाद्वारे आपण पाहतो. या स्तरावर फुटबॉल खेळायला मिळावे, असे अनेकांचे स्वप्नही असते. काहींचे पूर्ण होते तर काहींना अपयशाचाही सामना करावा लागतो. बाला देवीने मात्र केवळ स्वप्न पाहिले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी जीवाचे रानही केले. तिने एकही संधी सोडली नाही व अखेर परदेशातही आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली.
व्यावसायिक स्तरावर परदेशी क्लबसोबत करारबद्ध होणारी बाला देवी पहिली महिला खेळाडू आहे. एवढेच नव्हे तर रेंजर्सकडून खेळणारी ती पहिली आशियाई खेळाडू ठरली आहे. रेंजर्ससोबत झालेला तिचा करार व्यावसायिक फुटबॉलकडे पाहणाऱ्या देशातील लाखो महिला फुटबॉल खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल. भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम बाला देवीच्या नावावर आहे. बाला देवीने 2010 पासून आतापर्यंत 58 सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 52 गोल नोंदवले आहेत. दक्षिण आशियातील सर्वाधिक गोल करणाऱ्या महिला खेळाडूंमध्येही ती अग्रस्थानी आहे. वयाच्या 15व्या वर्षी तिने भारतीय संघासाठी पहिला सामना खेळला होता.
ज्या वयात मुली टेनिस, बॅडमिंटन, जलतरण असे खेळ खेळण्यासाठी उत्सुक असतात. त्या वयात बाला देवीने महिला फुटबॉलला फारसे गांभीर्याने घेतले जात नसतानाही हाच खेळ निवडला व आज ती भारताची नवी फुटबॉल क्विन बनली.
स्थानिक स्तरावरही तिने आपले वर्चस्व राखले आहे. देशांतर्गत विविध स्पर्धांमध्ये 120 सामने खेळताना गोलचे शतकही पूर्ण केले आहे. गेल्या दोन मोसमात भारतीय महिला फुटबॉल लीगमध्ये तिने सर्वाधिक गोल करत नवा विक्रम प्रस्थापित केला. तिने आपल्या कामगिरीच्या जोरावर 2015 व 2016 हे दोन्ही वर्षे भारताची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू म्हणून पुरस्कारही मिळवला. ती आज 30 वर्षांची असली तरीही तिचा उत्साह तिच्यापेक्षा लहान वयाच्या महिला खेळाडूंनाही लाजवेल असा आहे. फॉरवर्ड प्लेअर म्हणून तिने स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकेकाळी भारताच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार असलेली बाला देवी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवत आहे.
मणिपूरमध्ये जन्मलेली बाला देवी वयाच्या 19 व्या वर्षीच राज्य संघाकडून खेळली. या स्पर्धेतच तिचा खेळ पाहून ही मुलगी येत्या काळात देशपातळीवरील सर्वात यशस्वी खेळाडू ठरेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला होता. तिनेही त्यांचा हाच विश्वास सार्थ ठरवताना देशातील नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला. ती जेव्हा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली दमदार कामगिरी सिद्ध करत होती, तेव्हाच तिला राज्याच्या पोलीस दलात नोकरीही बहाल करण्यात आली व आज ती महिला पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. एक खेळाडू म्हणून ती राज्याकडून किंवा देशाकडून खेळते आणि जेव्हा स्पर्धा नसतात तेव्हा राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्षही ठेवते.
अफाट क्षमता असलेली ही खेळाडू आज भारताच्या महिला फुटबॉलचीच नव्हे तर संपूर्ण क्रीडाक्षेत्राची आयडॉल बनली आहे. अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवणारी बाला देवी 2014 व 2015 या दोन्ही वर्षी देशातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरली. भारतीय फुटबॉलकडे जेव्हा अत्यंत दुर्लक्ष केले जात होते त्यावेळी तिला या खेळात रस घेऊ नको, असे सल्लेही दिले जात होते. जी अवस्था भारतात महिला क्रिकेटची होती, त्यापेक्षाही बेकार गत फुटबॉलमध्ये होती. तरीही तिने आपल्या निर्णयावर ठाम राहताना यश मिळवले. काही खेळाडू असे असतात की जे त्या खेळामुळे मोठे होतात. मात्र, बाला देवी सारख्या खेळाडू त्या खेळालाही मोठे करतात व त्याची लोकप्रियताही उंचावतात.
मुळातच भारतात कधीकाळी हॉकी हा राष्ट्रीय खेळ असल्याचे जाणवत होते. मात्र, क्रिकेटचे वारे वाहायला लागले, त्यातून मिळणारा प्रचंड पैसा दिसायला लागला व अन्य खेळांकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यातून बॅडमिंटन, टेनिसला अच्छे दिन आले, पण महिलांचे क्रिकेट व फुटबॉल त्याच ठिकाणी होते. गेल्या पाच वर्षांत हे चित्र पालटू लागले व आज या खेळांनाही सुगीचे दिवस आल्याचे दिसून येते. केवळ बाला देवीच नाही तर येत्या काळात तिच्या पावलावर पाऊल ठेवून देशाला अनेक बाला देवी मिळाल्या तरच तिची प्रेरणा घेत देशाला फुटबॉलमधील नवे वर्चस्व मिळवणारा देश अशी ओळख मिळवून देईल, असा विश्वास वाटतो.
स्पर्धेतील पहिला गोल
बाला देवी हिने रेंजर्स फुटबॉल क्लबकडून पहिल्यांदाच व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा खेळताना पहिलावहिला गोल नोंदवला. महिलांच्या स्कॉटिश प्रीमिअर लीग स्पर्धेत बाला देवीने मदवेल फुटबॉल संघाविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. या सामन्यात रेंजर्सने 9-0 असा दणदणीत विजय मिळवला. दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर 65 व्या मिनिटाला बाला देवीने मैदानात पाऊल ठेवले व 85 व्या मिनिटाला गोल करत आपली गुणवत्ताही सिद्ध केली. युरोपातील सर्वोच्च महिला फुटबॉल स्पर्धा मानल्या जात असलेल्या या स्पर्धेत गोल करत अशी कामगिरी करणारी बाला देवी पहिलीच भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली. युरोपातील व्यावसायिक फुटबॉल विश्वात रेंजर्स संघाशी बाला देवीने गेल्या जानेवारीत करार केला होता. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा लांबणीवर पडली होती.
– अमित डोंगरे