पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्यांना सक्तमजुरी

शिक्रापुरात युवकाची सव्वा चार लाखांची केली होती फसवणूक

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पैशाचा पाऊस पडतो, असे नागरिकांना सांगून पैशाचा पाऊस पडण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या तीन भोंदू बाबांवर यापूर्वी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे जानेवारी 2017 मध्ये गुन्हे दाखल केले होते. या तिघांना आज शिरूर न्यायालयाने तीन वर्षे सक्‍तमजुरी व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

येथील सान्व्ही रेसिडेन्सी सोसायटीमध्ये अमोल वाबळे हे फॅब्रीकेशनचे काम करताना तेथे दाढी वाढलेले व भगवे कपडे घातलेले दोन भोंदू आले. त्यांनी वाबळे यास तुझेकडे फार लक्ष्मी आहे, असे म्हणत जवळ येण्यास सांगितले. तुझ्या धंद्यात काही अडचणी असतील तर आमचे आळंदी येथील गुरुमहाराज दूर करतात असे सांगितले आणि त्याच्या डोक्‍यावर हात ठेवत फुंकर मारली आणि झोळीतून जुन्या काळातील पाच रुपयांची नोट काढून ही दैवी शक्‍तीची नोट आहे, ही कोठेच मिळत नाही, असे सांगितले.

या नोटेचा विधी केल्यास तुझ्या मनात काय आहे ते तुला प्राप्त होईन, असे सांगत वाबळेजवळील एक रुपयाचा ठोकळा घेऊन तो आम्ही आळंदी येथील महाराजांना दाखवू, असे म्हणून अमोलचा मोबाईल नंबर घेऊन ते निघून गेले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी अमोल यास फोन करून तुझ्याजवळचा ठोकळा खरा आहे. त्यासाठी पूजा करायची आहे आणि पूजेचे साहित्य आणावे लागेल, असे सांगत अमोलला बोलावून साहित्य आणण्यासाठी नऊ हजार रुपये रोख घेतले. अमोलला शिक्रापूर एसटी स्थानकात जा तेथे एक महाराज बसलेले आहेत, ते तुम्हाला आमच्याजवळ घेऊन येतील, असे सांगितले.

अमोल वाबळे व आदित्य विरोळे हे शिक्रापूर एसटी स्थानकात गेले. तेथे एका भोंदूबाबाने त्या दोघांना स्मशानभूमीत नेले. तेव्हा स्मशानभूमीत एका महाराजाने काही वस्तूंची पूजा मांडली होती. तेथे त्या भोंदूबाबांनी एका मडक्‍यात एक रुपया टाकून त्याला लालकापडाने बांधले. काही वेळाने त्या मडक्‍यातून पन्नास रुपयांच्या दीडशे ते दोनशे नोटा बाहेर काढल्या. वाबळे यास पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काही विधी करायचा असून त्यासाठी स्मशानी धूप आणायचा आहे, असे सांगत भोंदूबाबांनी वाबळे यास संगमनेर बॅंकेचे खाते नंबर देऊन त्यामध्ये पैसे टाकण्यास सांगितले. यांनतर वेळोवेळी वाबळेंकडून चार लाख एकोणतीस हजार रुपये लाटले. अमोल वाबळे (रा. वाबळेवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सागरनाथ मिठानाथ परमार, चंदुनाथ सागरनाथ परमार, पटेलनाथ सम्जुनाथ चौहान (रा. सतलासा जि. म्हैसाणा, गुजरात, सध्या रा. सासवड, ता. पुरंदर) यांना अटक करत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, विलास आंबेकर हे करत असताना त्यांनी तपास करत पुरावे व साक्षीदार शिरूर न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी हिंगणगावकर यांनी तिघांना दोषी ठरवून प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड सुनावला. गुन्ह्यामध्ये सरकारी वकील म्हणून एस. एम. आरणे यांनी काम पहिले. न्यायालय अंमलदार म्हणून पोलीस नाईक भरत खेंगट यांनी काम पहिले.

  • पुण्यातील प्रकरण चव्हाट्यावर
    भोंदूबाबांच्या अटकेच्या बातमीनंतर पुणे येथील मंदार अरविंद वैद्य (रा. सिंहगड रोड विठ्ठलनगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे या भोंदूबाबांनी पैशाचा पाऊस पडण्याच्या बहाण्याने रोख स्वरुपात चौदा लाख रुपये घेऊन तर चंदुनाथ परमार याच्या बॅंक खात्यामध्ये साठ हजार रुपये टाकल्याबाबत तक्रार दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.