कराड दक्षिणमध्ये रोजगाराची वाणवा

कराड – कराड दक्षिण हा मतदारसंघ हा सुजलाम्‌-सुफलाम्‌ म्हणून ओळखला जातो. मात्र नैसर्गिक आपत्ती व वाढत्या महागाईमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. त्यामुळे नोकरी व रोजगारासाठी अनेकांना पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्यायच नाही. या मतदार संघातील प्रत्येक गावातील 80 ते 85 टक्के युवक नोकरीनिमित्त बाहेर पडले आहेत. त्यामुळे येथील युवकांना याच विभागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसीची गरज असल्याची प्रतिक्रिया कराड दक्षिणमधील मतदारांनी व्यक्‍त केल्या आहेत.

गावा-गावांत रस्त्यांची सोय करावी
कराड दक्षिणमध्ये अनेक गावांमध्ये रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. रस्त्यांअभावी काही गावात एसटीचीही सुविधा नाही. त्यामुळे तेथील लोकांचे मोठे हाल होत आहेत. अजूनही काही गावे मागासलेली आहेत. त्या गावात रस्त्यांची सोय करून इतर सुविधाही पोहोचवाव्यात. फक्‍त निवडणुकीपुरते कामाचा शुभारंभ करायचा आणि पुन्हा या गावाकडे ढुंकूनही पहायचे नाही. ही वर्षानुवर्षे असलेली पद्धत बदलली पाहिजे. येथील मुख्य दळणवळणाचा प्रश्‍न सोडवून युवकांना नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर दरवर्षी शासकीय नोकरभरती करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणीही बेरोजगार राहणार नाहीत.
अमोल यादव, तुळसण

समस्यांचे निराकरण करणारा उमेदवार गरजेचा
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणमधून स्वच्छ चारित्र्याचा व सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारा उमेदवार निवडून देणे आवश्‍यक आहे. आजपर्यंत ठराविक जणांचीच मक्‍तेदारी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपले प्रश्‍न आमदारांपुढे मांडता येत नाहीत. त्यामुळे ही मक्‍तेदारी मोडित काढून आमदारांशी सर्वांना संपर्क साधता आला पाहिजे. त्याचबरोबर विधानसभेत ग्रामीण भागातील समस्याही मांडता येईल असा उमेदवार हवा आहे.
धनंजय मोहिते, रेठरेबुद्रुक

पाटण-कडेगावची एमआयडीसी विकसित करावी
कराड येथील शुक्रवार पेठेतील महादेव मंदिर, संत तुकाराम मंदिराच्या मागील बाजूचे कोयनेश्‍वर मंदिर याठिकाणी प्रीतिसंगम बागप्रमाणे सुंदर बाग झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल. कराड दक्षिणमधील अनेक लोक पुणे मुंबई अथवा इतर ठिकाणी रोजगारासाठी गाव सोडून जातात. त्यांच्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये चांगल्या कंपन्या आणाव्यात, त्यासाठी पाटण, कडेगाव एमआयडीसी विकसित करावी. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्केट मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
विक्रम पवार, कराड

एमआयडीसी निर्माण होणे गरजेची
फक्‍त निवडणुकीपुरता युवा कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला जातो. मात्र त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत. येथील नेतेमंडळींमध्ये ज्यांच्या मोठ्या कंपन्या आहेत. ते आपल्या कंपनीत फक्‍त खालच्या स्तरावर आपल्याकडील युवकांना कामासाठी ठेवतात. उच्चपदावर मात्र परराज्यातील लोकांची नेमणूक केली जाते. एकप्रकारे येथील युवकांची पिळवणूक करण्याचा हा प्रकार आहे. तर काहींना आहे त्याच संस्था नीट चालवता येत नाहीत. ते दुसऱ्यांना काय काम देणार.

काही नेतेमंडळी निवडणुकीला मते मिळवतात एका मतदार संघातून तर यांच्या कंपन्या मात्र दुसऱ्या मतदार संघात अशी कराड दक्षिणमधील एकंदरीतच परिस्थिती आहे. वास्तविक पाहता या भागातील अनेक लोकांना नोकरीसाठी पुणे-मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे या भागात एमआयडीसी होणे आवश्‍यक आहे. ती झाल्यास युवकांना रोजगारासाठी परगावी जावे लागणार नाही.
विकास पाटील, काले

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)