दिव्यांगांसाठी रोजगारवाटा; वानवडी अपंग शिक्षण संस्था 

Edu Knowledge 
वानवडी येथील अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्रात पहिली ते दहावीपर्यंत दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड. मुरलीधर कचरे यांनी दिली. या मुला-मुलींसाठी निवासाची व्यवस्था असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ऍड. कचरे म्हणाले की, आयएसओ मानांकन असलेली ही संस्था गेल्या 63 वर्षांत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, कौशल्य, व्यावसायभिमुख शिक्षणाची जोड देत आहे. त्यांच्यासाठी स्वालंबनाचे धडे देत आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र निवासी, वसतिगृह, मोफत भोजन, निवास, गणवेश, शालेय साहित्य, वाचनालय, अत्याधुनिक फेजिओथेरपी व ऍक्‍युप्रेशनल थेरपीची सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, मैदान, व्यायामशाळा अशी सोय आहे.

प्रवेश घेतल्यानंतर शाळेच्या वतीने व्यवसायभिमुख आणि रोजगारांच्या वाटा उपलब्ध करण्यासाठी शिक्षण दिले जात आहे. यामध्ये शिवणकला, सुतारकला, संगणक, इलेक्‍ट्रिशीयन (वायरमन), रंगकाम, संगीत वर्ग, टेलरिंग, हस्तकला, कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जात आहे. कचरे म्हणाले की, संस्थेतर्फे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

पुणे, सोलापूर, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह गुजरात, बिहार, कर्नाटकातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक, कर्मचारी यांच्या माध्यमातून शाळेची वाटचाल सुरू आहे. गेल्या 63 वर्षांत संस्थेने नावीन्यतेचा ध्यास घेऊन दिव्यांगांना उभारी देण्याचा उपक्रम राबविला आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत सुमारे 4 ते 5 हजारांहून अधिक दिव्यांगांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी हे संस्थेसाठी झोकून देऊन काम करीत असल्यामुळे ही शाळा राज्यात आदर्शवत ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.