पुणे – विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या नवीन सुविधांच्या माध्यमातून पदविका अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. विद्यापीठाचा नेहमीच केवळ सहानुभूतीच्या पलीकडे विचार करून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात मदत करण्याची भूमिका राहिली आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. या सुविधेतून माजी दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागांतर्गत दिव्यांग अभ्यास व सर्वसमावेशक शिक्षण केंद्र आणि युथ फॉर जॉब फाउंडेशन यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार झाला. याप्रसंगी डिजिटल लायब्ररी व सहायक तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठीच्या नवीन सुविधांचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी डॉ. शिल्पा भिडे, शिक्षणशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. संजीव सोनवणे, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रा. वैभव जाधव, समन्वयक प्रा. धनंजय भोळे, युथ फॉर जॉब फाउंडेशनचे रमेश दुरईकन्नन, समीर नायर, धनश्री पागे आदी उपस्थित होते.
या करारांतर्गत युथ फॉर जॉब फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कॅपजेमिनी सी.एस.आर यांनी 25 आधुनिक संगणक, एलसीडी प्रोजेक्टर, प्रिंटर, लॅपटॉप प्रत्येकी एक अशा सुविधा केंद्रास उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा उपयोग सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या पदविका अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या कौशल्यातून प्रशिक्षणातून प्लेसमेंट वाढतील, अशी माहिती डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.