पुढील पाच वर्षात छोट्या उद्योगांमधून रोजगारनिर्मितीच्या संधी – मुख्यमंत्री

नागपूर: मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरकर जनतेने विजयी केले. आगामी काळात छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरात प्रथम आगमन झाल्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहात खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून नितीन गडकरी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार,जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि स्थानिक आमदार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी यांनी देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. त्या विकासकामांची पावती म्हणून नितीन गडकरी यांचा मोठ्या प्रमाणावर विजय मिळाला. आता पूर्वीच्या खात्यासोबतच नवीन खाते मिळाल्यामुळे आगामी काळात छोट्या उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील तरुणांच्या हाताला काम देण्याचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे खाते नितीन गडकरी यांच्याकडे आले असल्यामुळे आगामी पाच वर्षात छोट्या उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशामध्ये रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हा जनतेचा विजय –  नितीन गडकरी

हा विजय जनतेचा असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाबद्दल आभार मानताना सांगितले. या विजयामुळे देशात पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमापूर्वी प्रसिद्ध बॉलिवूड गायक नितीन मुकेश यांच्या जुन्या गाण्यांचा गीतगायन कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)