32 हून अधिक उद्योजक व कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार
दैनिक “प्रभात’ माध्यम प्रायोजक
पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या मॅनेजमेंट बिल्डिंग येथे होणार आहे. या मेळाव्यास दैनिक “प्रभात’ माध्यम प्रायोजक आहे.
मेळाव्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असेल. हा मेळाव्यातून महिला व पुरुष अशा दोन्ही गटांतील पात्र उमेदवारांची रोजगारासाठी निवड केली जाणार आहे. सुमारे 3 हजार रिक्त पदांसाठी जवळपास 32 हून अधिक उद्योजक व कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यायत सह्यादी हॉस्टिपल, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्डिऑलॉजी, टेक महिंद्रा लि. युरेका फोर्ब्स लि., दीनानाथ मंगेश हॉस्पिटल, प्रवीण मसालेवाले, ब्ल्यू डायमंड हॉटेल, हयात रिजेन्सी, फोर्स मोटर्स, महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चर्स लि. आणि इंडस हेल्थ प्रा. लि. यासारख्या कंपन्या व रुग्णालये सहभागी होणार आहेत. इयत्ता आठवीपासून ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांनाही नोकरीसाठी संधी उपलब्ध होणार आहे. यात मुला-मुलींनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्या डॉ. मुक्तजा मठकरी यांनी केले आहे.
मेळाव्यात शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची विविध पदांसाठी संबंधित उद्योजक अथवा कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या समोरासमोर मुलाखतीची संधी उपलब्ध असेल. त्यामुळे कौशल्य व नोकरी यांच्यातील दरी कमी होणार आहे. यात एक उमेदवार एकाच वेळी अन्य कंपन्यांसाठी मुलाखती देऊ शकेल.
आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांचे एम्प्लायमेंट एक्सचेंजचे रजिस्ट्रेशन नसले, तरी चालणार आहे. मुलाखतीसाठी येताना आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे फोटो व अर्जाच्या किमान पाच प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ अथवा एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्र उमेदवार व रिक्त पदे उपलब्ध असलेले कंपनी अथवा उद्योजक यांची एकमेकांसमोर प्रत्यक्षात मुलाखत होऊन नोकरीची निवड केली जाणार आहे. त्याचवेळी उमेदवारांना नियुक्तीचे पत्रे दिले जाणार असून, यातून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी “एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स’ने पुढाकार घेतला आहे.
– प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स.
ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्यासाठी नावनोंदणीसाठी संकेतस्थळ : www.mahaswayam.gov.in