मुंबई – मेट्रो शहरात नवीन तंत्रज्ञानावर आधारित रोजगार निर्मिती वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातही नवीन तंत्रज्ञानावर आधारित रोजगार वाढणार आहेत. केवळ रोजगार वाढणार नाहीत तर या कर्मचार्यांना उत्तम पगार मिळणार असल्याचे टीमलीज डिजिटल या मनुष्यबळ क्षेत्रातील कंपनीने म्हटले आहे.
टीमलीज डिजिटलच्या उपाध्यक्ष मुनिरा लोलीवाला म्हणाल्या की, पुण्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर उभारले जात आहेत. या क्षेत्रात रोजगार निर्मितीला वाव आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवा तसेच बिगर तंत्रज्ञान क्षेत्रातही पुण्यात रोजगार निर्मिती वाढेल.
सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, डेटा इंजिनियर्स या क्षेत्रातील कर्मचार्यांना उत्तम पगार मिळणार आहे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरमधील कर्मचार्यांना सुरुवातीला 9.37 लाख प्रति वर्ष, माहिती तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रातील कर्मचार्यांना 6.23 लाख रुपये प्रति वर्ष तर बिगर तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचार्यांना 6 लाख रुपये प्रति वर्ष पगार मिळण्याची शक्यता आहे.
सायबर सिक्युरिटी आणि नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचे महत्व वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे. हे तंत्रज्ञान निर्माण करण्यात आणि हाताळण्यात उपयोगी पडणारे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाबाबत तरुणात कमालीची उत्सुकता असून रोजगार निर्माण करणार्या या क्षेत्रातचे कौशल्य स्वीकारण्यात तरुण पुढे आहेत असे त्यांनी सांगितले.