नगर – मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मनपाचे यंदाचे (2023-2024) बजेट स्थायी समितीला सादर केले आहे. 1 हजार 240 कोटी रूपयांच्या या बजेटमधील उत्पन्न व खर्चाच्या विविध तरतुदींवर स्थायी समितीने बुधवारपासून चर्चा सुरू केली. पहिल्या टप्प्यात वसुलीसह विविध उत्पन्नाच्या बाजूस विविध वाढीव तरतुदी त्यांनी केल्या. दरम्यान, या बजेट चर्चा सभेत सभापती गणेश कवडे यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. पगार घेता ना, मग मनपा आपली समजून किमान 50 टक्के तरी काम करा, असा उपरोधिक सल्लाही दिला.
या चर्चेत सभापती कवडेंसह विरोधी पक्ष नेते बारस्कर, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, नजू पहेलवान, नगरसेविका पल्लवी जाधव, प्रदीप परदेशीव अन्य सदस्यांनी भाग घेतला.
महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी राखून ठेवलेल्या रकमेतून तब्बल 75 टक्के पैसे गायब झाले असून, या खात्यात एक रूपयाची शिल्लक नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केल्याने मनपाच्या स्थायी समितीची बजेट चर्चा बुधवारी काहीकाळ स्तब्ध झाली. बारस्कर यांच्या या दाव्यावर प्रशासन निरूत्तर झाले. त्यामुळे बजेटची चर्चा स्थगित करण्यात आली व आज गुरूवारी (16 मार्च) मनपा नगर रचना विभागाचे सहायक संचालक राम चारठाणकर यांच्याकडून या गायब रकमेबाबत स्पष्टीकरण घेण्याचे ठरले.
पाईपलाईन रस्त्यावरील एका जागेवरील आरक्षण उठवून ते दुसऱ्या जागेवर दाखवले. पण, ती जागा मूळातच ओढ्यात आहे व मनपाने चक्क ओढ्यात ले-आऊट मंजूर केला, असाही दुसरा आरोप बारस्कर यांनी केला. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगेंसह अन्य कोणीही उत्तर दिले नाही. मात्र, नगर रचना विभागाशी संबंधित हे प्रश्न असल्याने व याविभागाचे प्रमुख सहायक नगररचना संचालक राम चारठाणकर उपस्थित नसल्याने या विषयांवर आज गुरूवारी होणाऱ्या बजेट सभेत चर्चा करण्याचा निर्णय झाला.