शंकर दुपारगुडे
कोपरगाव – कोपरगावच्या एसटी आगारात काही कर्मचारी कामाच्या वेळेत जुगार खेळतानाचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला होता. याची दखल घेत एसटी महामंडळाने कोपरगाव आगारातील पत्ते खेळणाऱ्या त्या ६ कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करून त्यांची सखोल चौकशी सुरू केली असून राज्यातील इतर आगारांची माहिती मागवली आहे. निलंबित केलेले कर्मचारी आगारातील कार्यशाळेत अर्थात वर्कशॉपमध्ये काम करणारे कर्मचारी होते.
या घटनेमुळे काम नसल्यानंतर विरंगुळा म्हणून जुगार खळणाऱ्यांची आता हवा टाईट झाली आहे. कोपरगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी पत्ते खेळण्याला महत्व देत एका एसटीच्या चाकात हवा भरण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी कामगारांची हवा टाईट केल्याचे चित्र आहे.
एसटी महामंडळाचा कोणता कर्मचारी किती काम करतो. कोण कोणते कामे केली जातात व गेल्या वर्षभरापासून कोणत्या आगारात कोणकोणत्या गाड्यांची देखभाल दुरुस्ती केली याची सविस्तर माहित संकलीत करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच कोपरगाव आगारासाठी गेल्या वर्षभरापासून कोणत्या गाड्यांचे कामे किती प्रमाणात झाले. किती नवीन साहित्याची खरेदी झाली. त्या साहित्याचा कोणत्या गाड्यांसाठी वापर केला आहे. कोपरगाव आगारात प्रवाशी वाहतुक करण्यासाठी इतर आगाराच्या येणाऱ्या २ हजार गाड्यांची माहीत व त्यांच्या लॉकसिटची चौकशी सुरु झाली.
राज्यातील इतर आगाराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी तब्बल १ हजार ५०० कर्मचारी राज्यभर कामाला लागले आहेत. त्यामुळे कोपरगाव आगारातील पत्त्याच्या खेळाने राज्यातील २५० आगारातील किती कर्माचाऱ्यांच्या आयुष्याचा खेळ होईल हे सांगता येणार नाही.
अहमदनगर जिल्ह्यात ११ आगारांमध्ये कोपरगाव आगाराचे काम अतिशय उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षभरात करोनाच्या संकटात कोपरगाव आगार उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकवर आहे. मालवाहतुक सेवेतही अग्रभागी आहे. मात्र काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे कोपरगाव आगाराचे नाव राज्यात बदनाम झाले.
दरम्यान एसटी महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले की,जुगार खेळण्याच्या या प्रकरणात आता गव्हा बरोबर किडेही रगडले जाणार आहे. वर्षभराच्या चौकशीत अनेक आगारातील कर्मचारी विविध प्रकरणात दोषी आढळण्याची शक्यता दाट आहे. काम नसले की विरंगुळा म्हणून पत्ते खेण्याची सवय राज्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना आहे. परंतु आता या प्रकरणाने कर्मचाऱ्या बरोबर राज्यातील काही अधिकाऱ्यांचे कारनामे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साहित्य खरेदी असो किंवा अन्य आर्थिक व्यवहार, देखभाल दुरुस्तीच्या कामाची एसटी महामंडळ सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याने या प्रकरणात कधी कोणाचा बळी जाईल हे येणार काळ ठरवेल. राज्यातील संपूर्ण एसटी महामंडळ कोपरगाव जुगार प्रकरणाने खडबडून जागे झाले आहे.