कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांना कारवाईवेळी धक्काबुक्की

पथारी व्यावसायिकांचा विरोध : लष्कर पोलिसांत तक्रार

पुणे – लष्कर परिसरातील बेकायदेशीर हातगाड्या व पथारी व्यावसायिकांवर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान महात्मा गांधी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविताना विभागाच्या कर्मचाऱ्यांना पथारी व्यावसायिकांनी धक्काबुक्की केल्याचे बोर्डाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी बोर्डाच्या आरोग्य विभागाने पोलिसांकडे धाव घेतली असून, यापुढे कारवाई करताना पोलिसांचे संरक्षण घेतले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागातर्फे ही कारवाई केली जात आहे. त्यानुसार विभागप्रमुख संजय झेंडे, पर्यवेक्षक आर. टी. शेख, राहुल दराडे, प्रमोद कदम या अधिकाऱ्यांच्या पथकातर्फे ही कारवाई केली जात आहे. पथकाने कॅन्टोन्मेंट परिसरातील एम. जी. रोड, अरोरा टॉवर्स, मोलेदिना रोड, वानवडी रोड, वानवडी बाजार, न्यू मोदीखाना, पूना कॉलेज, हिदायतुल्ला रोड या भागात जोरदार कारवाई करत अतिक्रमणे काढली. याअंतर्गत आतापर्यंत या कारवाईत सुमारे दहा हातगाड्या व पथारी व्यावसायिकांचा माल जप्त केला असून तब्बल 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, बुधवारी महात्मा गांधी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविताना पथारी व्यावसायिकांनी बोर्ड कर्मचाऱ्यांना विरोध केला. यावेळी धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. यावर बोर्डाने लष्कर पोलिसांत तक्रार नोंदवल्याचे विभागप्रमुखांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वीही अतिक्रमणविरोधी कारवाई करताना बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे यापुढे पोलिस संरक्षणातच कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)