निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी कर्जतला; तलाठ्यांकडून नागरिकांची हेळसांड

जामखेड – येथील तहसील कार्यालयातील सर्कल, तलाठी यांच्यासह अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी कर्जत येथे जात असल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कामकाजाकरीता काही कर्मचारी कार्यालयात शिल्लक ठेवून इतरांना निवडणूक कर्तव्यावर नेमलेले असताना कामाकाजासाठीचेही कर्मचारी निवडणुकीचेच कारण सांगत गायब होत असल्याने तहसीलची कामे खोळंबली असून सध्या अनेक शेतकऱ्याचे सर्कल, तलाठ्याकडे कामे खोळंबलेली असतानाच सर्कल तलाठी जागेवर सापडत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जामखेड तहसील कार्यालयात आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे तहसीलसह वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामाच्या वेगवेगळ्या कर्तव्यावर नेमण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीची जबाबदारी दिलेले अधिकारी-कर्मचारी हे तहसीलच्या परिसरातच दिसतात. परंतु, दैनंदिन कामकाज थांबू नये याकरता शिल्लक राहिलेले कर्मचारी मात्र निवडणुकीच्या नावाखाली इतरत्र फिरत असल्याने सर्वसामान्यांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास बहुतांश अधिकारी-कर्मचारी फोन स्विकारत नाहीत. एखाद्याने स्विकारला तर निवडणुकीच्या कामाला कर्जतला आलोय असे उत्तर मिळत असल्याने कीती खरे आणि किती खोटे याची वरिष्ठांनी पडताळणी करून दैनंदिन कामाकाजासाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना खुर्चीवर हजर राहण्याबाबत सक्त सूचना देण्याची गरज व्यक्त होत आहे.

या निवडणुकीच्या कारणामुळे तहसीलमधील शालेय विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रे, सातबारावरील चुकीची दुरुस्ती, फेरफार संबंधित कामे, रस्त्यांसंदर्भात प्रकरणे, रेशनकार्ड, वैद्यकीय सेवेसाठी तहसीलचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र यासह अन्य कामांवर परिणाम होताना दिसत आहे. तहसील कार्यालयातील कर्मचारी गायब होत असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांसह शहरातून विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

नागरिकांची वेळ व पैशांचा होतेय अपव्यय
तालुक्यासह शहरातील अनेक नागरिक तहसील कार्यालयामध्ये विविध कामांसाठी येत आहेत. यासाठी त्यांना ग्रामीण भागातून तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी कामे सोडून येतात मात्र, कार्यालयात आल्यावर तहसील मधील कर्मचारी निवडणुक कामांच्या नावावर कर्जत येथे असल्यामुळे कामे होत नाहीत. दिवसभर ताटकळल्यावर त्यांना हात हलवत गावी परत जावे लागत असल्याचे चित्र येथे बघावयास मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)