मार्ग काढताना अपघाताची शक्यता
वडगाव मावळ – पावसामुळे उर्से (ता. मावळ) येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने वाहन चालक, पादचारी त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी
केली आहे.
उर्से परिसरात औद्योगिक क्षेत्र असून, कारखानदारी आहे. अवजड वाहतूक तसेच कामगार, दुग्धव्यावसायिक, विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते. संततधार पावसामुळे रस्त्यावर फिनोलेक्स केबल कंपनीसमोर रस्त्याला ओढ्याचे स्वरुप आले आहे. जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन चालक, पादचारी त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रदीप धामणकर, दिलीप कारके, अक्षय धामणकर, रोहिदास धामणकर, कुलदीप धामणकर, किसन शिंदे आदी ग्रामस्थांनी केली आहे.