सासवड – येथील तहसील कार्यालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसले आहे. येथील स्वच्छतागृहात प्रचंड घाण साचलेली असून या शौचालयाचा वापर करणे तर सोडाच शौचालयापासून जाताना देखील नाकाला रूमाल लावुन जावे लागते, त्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
सासवड तहसील कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार ही अधिक असल्यामुळे धुराने प्रदुषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनाची कोणतीही व्यवस्था तहसील कार्यालयाकडून केली गेलेली नाही, त्यामुळे तहसील कार्यालयात तयार होणारी रद्दी व नको असलेली कागदपत्रे शौचालया शेजारच्या भागात टाकली जातात व त्या ठिकाणी पेटवून दिली जातात. तसेच तहसील कार्यालयासमोरील सासवड-कापूरहोळ रस्त्याच्या कोपऱ्यावर कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत.
तहसील कार्यालयासमोरही कचऱ्याचे ढीग पडलेले आहे. याबाबत सासवड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण म्हणाले की, तहसील कार्यालयातील शौचालयाची देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असते. सासवड नगरपालिकेकडून सहकार्याच्या भावनेतून तहसील कार्यालयातील या शौचालयाची दुरुस्ती व स्वच्छता केली जाते.