पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील काही विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यातच करोना बाधितांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेवर भर देण्याच्या सूचना उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरूंना मंगळवारी दिल्या.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात सामंत यांनी सर्व पारपंरिक विद्यापीठाच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या, परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, याचा आढावा घेतला. करोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची काळजी घेत सुरक्षितपणे परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीवर भर देण्याबाबत चर्चा झाली.
पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा 10 एप्रिलपासून सुरू होत आहे. यासाठी सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने विनाअडथळा पार पडण्यासाठी नियोजन सुरू आहे. याची माहिती पुणे विद्यापीठातर्फे देण्यात आली.