बारामती, (प्रतिनिधी)- शरद पवार यांचे नेहमी सांगणे असते की, तालुक्याच्या प्रत्येक गावात जाऊन तेथील स्थानिक अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत.
त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच भूमिकेतून आपण स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे, असे सांगत युगेंद्र पवार यांनी चौथ्या दिवशी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली.
आपल्या तालुक्यात अलीकडच्या काळात बेरोजगारी वाढली आहे, ती दूर करण्यासाठी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
युगेंद्र पवार म्हणाले की, मुर्टी या गावाला शिक्षकांचे गाव म्हणून सर्वत्र ओळखले जाते, याचा आनंद वाटतो. बारामतीची स्वाभिमानी जनता हिच शरद पवार यांची खरी ताकद आहे.
आपण कायम सत्याची बाजू घेतली आहे. भविष्यात सुध्दा घेत राहू. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारे आणि कर्जमाफी करणारे कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांची देशात ओळख आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दौऱ्यात युगेंद्र पवार यांनी खामगळवाडी, कानडवाडी, मोराळवाडी, मोढवे, मुर्टी, जोगवाडी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली या गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत बोरकर, कार्याध्यक्ष गौरव जाधव, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ स्वाभिमान यात्रेत सहभागी झाले होते.
बारामतीत आयटी पार्कसाठी प्रयत्नशील
युगेंद्र पवार म्हणाले की, शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात आपल्या बारामतीत आयटी पार्क आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
याशिवाय गावातील स्थानिक प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष कायम प्रयत्नशील राहील, आपल्या भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शरयू फाउंडेशनने मोठे काम केले आहे, याचे समाधान आहे. वन गायींपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी दिला.