रस्ते निर्मितीवर अधिक भर दिला – माधुरी मिसाळ

पुणे – उत्कृष्ट आणि टिकाऊ दर्जाच्या रस्ते बांधणीकडे कॉंग्रेस आघाडी सरकारने कायमच दुर्लक्ष केले. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन पर्यायी रस्त्यांची निर्मिती झाली नाही. गेल्या पाच वर्षांत मुख्य आणि अंतर्गत रस्ते निर्माण करण्यावर भर दिला. सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गाची निर्मिती, स्मार्ट सिटीअंतर्गत बिबवेवाडी रस्ता ही विकासकामे पूर्ण केल्याचा दावा आमदार माधुरी मिसाळ यांनी केला.

पर्वती मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार मिसाळ यांच्या प्रचारार्थ अप्पर इंदिरानगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती. नगरसेवक बाळा ओसवाल, गोपाळ चिंतल, रुपाली धाडवे, सुनीता चिंतल, सागर वाल्हेकर, भीमराव साठे, शशी फापळ, दिनेश धाडवे, विनीत पिंगळे, विकास लवटे, बाबुराव घाडगे, नीता थोरवे, अनिता दीक्षित, गौरव घुले, जयश्री तोडकर, वर्षा साठे, गणेश हणमघर आदी सहभागी झाले.

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्त्याचे काम अंमिम टप्प्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर बिबवेवाडी मुख्य रस्ता विकसित केला. पु. ल. देशपांडे उद्यान ते नवश्‍या मारुती पादचारी मार्गाची निर्मिती केली. अंतर्गत रस्ते आणि सोसायट्यांमधील रस्त्यांची कामे पूर्ण केली. सनसिटी, धनलक्ष्मी, महालक्ष्मी, विठ्ठलनगर, सिंहगड रस्ता परिसरातील वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते लवकरच उपलब्ध होतील. बिबवेवाडी रस्ता सुशोभिकरणाने वेगळा आयाम निर्माण झाला आहे, असे मिसाळ यांनी नमूद केले.

आगामी काळात वाहतूक अधिक सुरक्षित आणि कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे सुरक्षा अहवाल करून विनाअडथळा पदपथ, शास्त्रशुद्ध गतिरोधक, रस्ते खोदाई धोरण, सिग्नलचे सुसूत्रीकरण कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मिसाळ यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.