पिंपरी – अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांचा विविध व्यक्तींशी येणारा संपर्क आणि त्यामुळे करोना प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता, महापालिकेकडून जागेवर जाऊन करोना चाचणी केले जात आहे. दर 15 दिवसाला मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून दुकानदारांची अँटीजेन चाचणी केली जाते. करोनाचे तत्काळ निदान होत असल्याने करोनाचा प्रसार नियंत्रणात रहाण्यासाठी मदत होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाची दुसरी लाट तीव्र होती. या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. जूनमध्ये दुसरी लाट ओसरली. रुग्णसंख्या नियंत्रणात आली. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचा दररोज विविध नागरिकांशी संपर्क येतो. दुकानदार, भाजी विक्रेते, पथारीवाले, वाहनचालक, एसटी आणि पीएमपीएमएलमध्ये काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिक्षक, आरोग्य सेवा देणाऱ्या व्यक्ती आदींचा “सुपर स्प्रेडर्स’मध्ये समावेश येतो.
एखादा दुकानदार पॉझिटिव्ह असल्यास करोनाचा प्रसार होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने “सुपर स्प्रेडर्स’वर लक्ष केंद्रित केले आहे.
चाचणीकरिता शहराच्या विविध भागांत मोबाइल व्हॅन ठेवल्या असून भरारी पथकाची मदत घेऊन दुकानदारांची कोरोना चाचणी केली जाते. मोबाइल व्हॅनमध्ये वैद्यकीय अधिकारी, डेंटिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मदतनीस अशा 5 लोकांची टीम असते. नागरिक चाचणीला येत नाहीत. त्यामुळे जागेवर जाऊन चाचणी करणे गरजेचे आहे.
दुकानदारांना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आणि दर 15 दिवसाला चाचणी करणे बंधनकारक केले आहे. महापालिकेकडून मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून दुकानदारांची करोना अँटीजेन चाचणी जात आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे,
वैद्यकीय अधिकारी