दावडी, (वार्ताहर) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाम (ता.खेड) येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयास भेट दिली. अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी प्रथमच खेड तालुक्यातील भाजपच्या जिल्हा कार्यालयास थेट भेट दिली. दरम्यान, महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि उमेदवाराचे काम सर्वांनी एकदिलाने जोमाने काम करावे, यासाठी पवार वातावरण तयार करत आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपला खासदार निवडून आणण्यासाठी पवार यांनी खास मोहीम आखली आहे. बुधवारी (दि. 20) खेड तालुक्यात शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यातच त्यांनी बुधवारी अचानक भाजपच्या संतोषनगर भाम येथील जिल्हा कार्यालयास भेट दिली.
यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सुरेश घुले, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, सरचिटणीस संजय रौंधळ, ताराचंद कराळे, भगवान शेळके, खेडचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,
महिला अध्यक्ष कल्पना गवारी, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आंबेगावचे अध्यक्ष संदीप बाणखेले, शिरूर बेटचे अध्यक्ष मारूती शेळके, राजेश काळे, राहुल गव्हाणे, रोहित खैरे, सचिन मचाले यांच्यासह भाजपच्या विविध पदाधिकारी यांनी अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मोदींच्या विचाराचा खासदार…
अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्याकडून भाजपने शिरूर लोकसभा मतदारसंघात केलेल्या तयारीची बारकाईने माहिती घेतली. भाजपने तयार केलेली बूथ रचना, बूथचे व्हॉट्सअॅप ग्रुप, शक्ती केंद्र, लाभार्थी संपर्क, गाव चलो अभियान या सर्व उपक्रमांची माहिती घेतली.
पवार यांनी भाजपच्या जिल्हा आणि तालुका पातळीवरील विविध पदाधिकार्यांचा परिचय करून घेऊन मोकळेपणाने सर्वांना फोटोसाठी वेळ दिला. सर्वांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदी यांच्या विचाराचे खासदार दिल्लीत पाठवूया, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.