बारामती, (वार्ताहर)- बारामती तालुक्यातील गावोगावी जाऊन सामान्य जनतेची मते जाणून घेतानाच पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावरही आपला भर असेल, असे प्रतिपादन बारामतीचे नवनिर्वाचित निरीक्षक सुरेश पालवे यांनी केले.
बारामती विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश पालवे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. यावेळी राष्ट्रवादी शहर कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.निरीक्षकपदी नेमणूक होताच सुरेश पालवे यांनी बारामतीत शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पालवे म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे मताधिक्य कसे वाढेल यावर विशेष लक्ष देणार आहे. एकूणच आधी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, नंतर बूथ कमिट्यांचे पुनर्गठण आणि आता निरीक्षकांची नेमणूक करीत अजितदादांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या काळात पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूकही केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यानंतर अजितदादांनी बारामतीत कार्यकर्ता मेळावा घेत पराभवाची जबाबदारी आपली असल्याचं जाहीर केले. बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याच्या सूचना केल्या होत्या.
बारामती शहर आणि तालुक्यातील बूथ कमिट्यांचे पुनर्गठण करण्याची जबाबदारी माजी नगरसेवक किरण गुजर यांच्यावर देण्यात आली आहे. अशातच आता बारामती विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश पालवे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अक्शन मोडमध्ये आले आहे.