न्यूयॉर्क – दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या करोनाच्या नवीन विषाणूमुळे न्यूयॉर्क शहरात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथे होचूल यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या अधिकारात न्यूयॉर्कमधील रुग्णालयांना रुग्णांसाठीची क्षमता वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
“ओमिक्रोन’ असे नाव देण्यात आलेला हा नवीन विषाणू आतापर्यंतच्या विषाणूंपेक्षा सर्वाधिक घातक आणि संसर्गजन्य असल्याचे मानले जाते आहे. आतापर्यंत संसर्ग रोखण्यासाठी मास्क, लसीकरण, सामाजिक अंतर यासारख्या सामान्य उपाय योजना सांगितल्या जात होत्या. मात्र नवीन विषाणू या खबरदारीच्या उपाय योजनांनंतरही संसर्ग करू शकतो, असे म्हटले जात आहे. म्हणून त्याला रोखण्यासाठी अधिक सक्षम लसींच्या निर्मितीची आवश्यकता भासू शकते.
न्यूयॉर्कमध्ये करोनामुळे 2020 साली मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता अधिक जीवितहानी होऊ नये यासाठी ही आणीबाणी जारी केली जाणार आहे. या नवीन उपाय योजना 3 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. या उपाय योजना करोनाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांप्रमाणे कठोर किंवा सामाजिक निर्बंध लादणाऱ्या असणार नाहीत. मात्र तरिही न्यूयॉर्कमध्ये नवीन रुग्णसंख्या वाढू नये यासाठी गव्हर्नर होचूल यांच्याकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
न्यूयॉर्कमध्ये लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र तरिही नवीन संसर्गाची प्रकरणेही वाढू लागली आहेत. युरोपातील काही देशांमध्ये पॉझिटिव्हिटीचा दर 10 टक्के इतका वाढला आहे. अलिकडेच न्यूयॉर्कमधील दैनंदिन पॉझिटिव्हीटीचा दर 37 टक्के झाला होता. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 56 हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.