कैरो : गाझाच्या फेरउभारणीसंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेली अरब देशांची आपत्कालिन परिषद इजिप्तने पुढे ढकलली आहे. ही परिषद आता ४ मार्च रोजी कैरो येथे होईल, असे इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
ही परिषद २७ फेब्रुवारीला होणार होती. मात्र या परिषदेच्या पुर्वतयारीसाठी आणि आणि अन्य उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी ही परिषद लांबणीवर टाकण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे. गाझामध्ये सध्या असलेल्या सर्व पॅलेस्टिनींना तेथून दुसऱ्या देशामध्ये हंगामी किंवा कायम स्वरुपात हलवण्यात यावे.
शेजारच्या जॉर्डन आणि इजिप्तमध्ये या पॅलेस्टिनींना हलवण्यात यावे आणि गाझाचा विकास करण्यात यावा. हा विकास करण्यासाठी अमेरिका गाझाला ताब्यात घेईल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला पॅलेस्टिन आणि बहुतेक सर्व अरब देशांनी विरोध केला आहे. केवळ इस्रायलने ट्रम्प यांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.