Emanjot Chahal Joins RR IPL 2026 : आयपीएल २०२६ चा लीग टप्पा आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. २४ मे रोजी या हंगामातील शेवटचे दोन महत्त्वपूर्ण लीग सामने खेळवले जाणार आहेत. यातील सर्वात हायव्होल्टेज सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या ‘डू ऑर डाय’ सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थानचा खेळाडू रवि सिंह दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला असून, संघ व्यवस्थापनाने तातडीने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रवि सिंह बाहेर; पंजाबच्या ऑलराउंडरची एन्ट्री राजस्थान रॉयल्सचा रवि सिंह ‘हॅमस्ट्रिंग’च्या गंभीर दुखापतीमुळे चालू हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी राजस्थानने पंजाबच्या युवा अष्टपैलू खेळाडूला म्हणजेच इमनजोत चहल याला संघात सामील केले आहे. इमनजोत चहलला राजस्थान रॉयल्सने ३० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर आपल्या ताफ्यात घेतले आहे. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या इमनजोतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आतापर्यंत ३ प्रथम श्रेणी सामन्यांत ८३ धावांच्या सर्वोत्तम स्कोअरसह १०५ धावा केल्या आहेत. तसेच, उत्कृष्ट फिरकीच्या जोरावर त्याने या ३ सामन्यांत ११ विकेट्स देखील घेतल्या आहेत. मुंबईला हरवा अन् थेट प्ले-ऑफ गाठा! राजस्थान रॉयल्सचा संघ अजूनही प्ले-ऑफच्या शर्यतीत मजबूत स्थितीत आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. राजस्थानला प्ले-ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी इतर कोणत्याही संघाच्या गणितावर अवलंबून राहण्याची गरज नाही. २४ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांना केवळ विजय मिळवणे आवश्यक आहे. हेही वाचा – Rohit Sharma Fitness : ‘त्या’ गंभीर दुखापतीनंतर रोहित शर्मा नक्की किती फिट? इम्पॅक्ट प्लेयर बनवण्यामागचं खरं कारण अखेर आलं समोर बंगळुरू आणि गुजरातमध्ये रंगणार ‘क्वालिफायर १’ या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB), गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे तीन संघ आधीच प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता चौथ्या स्थानासाठी पंजाब, राजस्थान आणि दिल्ली यांच्यात चुरस आहे. बेंगलुरु आणि हैदराबादने आपले सर्व सामने खेळले असून आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली आहे. त्यामुळे आयपीएल २०२६ चा पहिला ‘क्वालिफायर-१’ सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाईल, हे आता निश्चित झाले आहे.