न्यूयॉर्क : ‘ट्विटर’ ची मालकी हातात आल्यानंतर नवे मालक एलॉन मस्क यांनी रोज नवनवे निर्णय घेत सर्वांना धक्का दिला. दरम्यान, आता एलॉन मस्क यांनी कंपनी दिवाळखोरीत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक वरिष्ठ कर्मचारी कंपनी सोडून जात असल्याने एलॉन मस्क यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना यासंबंधी इशारा दिला आहे.
एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना संवाद साधताना दिवाळखोरीची शक्यता आपण नाकारु शकत नसल्याचे म्हटले आहे. एका संकेतस्थळाने याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, सध्या ट्विटरचे दोन वरिष्ठ कर्मचारी रोथ आणि व्हिलर यांनी राजीनामा दिला आहे. जाहिरातीसंबंधी चिंता निर्माण झाल्याने बुधवारी त्यांनी मस्क यांच्याशी ट्विटर स्पेसेस चॅटसंदर्भात चर्चा केली होती. त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान रोथ आणि व्हिलर यांनी यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
याआधी ट्विटरचे मुख्य सुरक्षा अधिकारी Lea Kissner यांनी ट्विट करत आपण राजीनामा दिल्याचे सांगितले होते. मुख्य गोपनीयता अधिकारी डॅमियन आणि मुख्य अनुपालन अधिकारी मारियान यांनीही राजीनामा दिला आहे. एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’चा ताबा घेतल्यानंतर आठवडय़ाभरातच अपेक्षेप्रमाणे नोकरकपात सुरू झाली.
सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना नोकरीवरून कमी करण्याबाबतचा ईमेल पाठवण्यात आला. अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. भारतामध्ये सुमारे २३० ते २५० च्या दरम्यान कर्मचारी होते, एका इंग्रजी वर्तमापत्राने दिलेल्या माहितीनुसार, आता भारतामधील ट्विटरच्या कार्यालयात १० कर्मचारीही शिल्लक नाहीत.