वॉशिग्टन – टेस्ला आणि ट्विटरसारख्या नामांकित कंपन्यांचे मालक असणारे एलॉन मस्क फ्रान्सच्या बर्नार्ड अनॉल्टला मागे टाकून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत. “ब्लूमबर्ग बिलियनेस’ या संस्थेनुसार मस्क यांची एकूण संपत्ती 187.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 15.46 लाख कोटी रुपये)इतकी झाली आहे. गेल्या वर्षी मस्क यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होचे. त्यामुळे त्यांची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती.
त्यांच्यापाठोपाठ जगातील सर्वात मोठा फॅशन ग्रुप “लुईस विटो मोएट हेनेसी’ चे मालक असणारे बर्नार्ड यांची 185.3 अब्ज डॉलर्ससह (15.32 लाख कोटी रुपये) दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून गेल्यावर्षी डिसेंबरच्या मध्यात त्यांनी मस्कला हटविले होते. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या अव्वल 10 श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत. तर हिंडेनबर्ग संस्थेच्या आरोपांनंतर उद्योपती गौतम अदानींची 32 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या स्थानावर
“ब्लूमबर्ग बिलियनेस’ अहवालानुसार मस्क श्रीमंतांच्या यादीत “नंबर वन’ ठरले असले तरी, फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या स्थानावर तर बर्नार्ड रनॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी मस्क यांची संपत्तीत मोठी घट झाली होती. मात्र यावर्षी जानेवारी महिन्याआधी मस्क यांच्या संपत्तीत तब्बल 50.1 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
180 अब्ज डॉलरचे नुकसान
गेल्या वर्षी टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मस्क यांना तब्बल 180 अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. या नुकसानाची “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद झाली. त्यामुळे मस्क एका वर्षात 180 अब्ज डॉलर्स गमावणारे पहिले व्यक्ती ठरले होते. त्यानंतर आता टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची क्रमवारी सुधारली आहे.
अंबानी भारतातील एकमेव
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी अव्वल दहा श्रीमंतांच्या यादीतील एकमेव भारतीय आहेत. 81.1 अब्ज डॉलर (6.70 लाख कोटी रुपये) संपत्तीसह अंबानी 10 व्या क्रमांकावर आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस, चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स आणि पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे यांचा नंबर लागतो. विशेष गोष्ट म्हणजे एकेकाळी यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी 37.7 अब्ज (सुमारे 3.11 लाख कोटी) संपत्तीसह आता 32 व्या क्रमांकावर पोचले आहेत.
अव्वल दहा श्रीमंत (सर्व आकडे अब्ज डॉलर्समध्ये)
– एलॉन मस्क (187.1)
– बर्नार्ड अनॉल्ट (185.3)
– जेफ बेझोस (117)
– बिल गेट्स (114)
– वॉरेन बफे (106)
– लॅरी एलिसन (102)
– स्टीव्ह बाल्मर (89.4)
– लॅरी पेज (4)
– कार्लोस स्लिम (83.2)
– मुकेश अंबानी (81.1)