जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब – राज्यपाल कोश्यारी

रत्नागिरी :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्ली (आय.सी.एच.आर.) आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

“आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्लीमार्फत स्वा. सावरकर यांच्यावरील ‘Dismantling Casteism: Lessons from Savarkars Essentials of Hindutva’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत, सरस्वती वंदना, स्वा. सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असली तरी आजही भारतात काही गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भारतातून ही जातीयता जेव्हा नष्ट होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज, राष्ट्र सुस्थिर होईल. भारतीय जातीव्यवस्था, अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वा. सावरकर यांनी रत्नागिरीत केलेले कार्ये अत्यंत महत्त्वाची आणि गौरवपूर्ण आहेत. स्वा. सावरकर यांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत ही राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे, ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. स्वा. सावरकर हे सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते. आज देशाला स्वा. सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर सन्मानित अतिथी गुरू घासीदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अशोक मोडक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला, बीजभाषक केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे  रणजित सावरकर आय.सी.एच.आर.चे सदस्य सचिव प्रा. कुमार रत्नम, परिषदेचे समन्वयक आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. उमेश अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.