भीमा कोरेगाव प्रकरण: वरवरा राव यांना 6 महिन्यांचा अंतरिम जामीन

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी तेलगू कवी आणि कार्यकर्ता वरवरा राव यांना सोमवारी सहा महिन्यासाठी अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला. त्यांना 50 हजार रुपयांचा व्यक्तीगत जातमुचलका देण्याचे आदेश देण्यात आले.

82 वर्षीय राव यांच्या पत्नी पी. हेमलता यांनी त्यांची ढासळती प्रकृती आणि वयोमानाप्रमाणे असणारे आजार या कारणांमुळे वैद्यकीय कारणांसाठी जामीन मागणारी याचिका दाखल केली होती.

नानावटी रुग्णलायाने त्यांना या आधी दिलेल्या अहवालात राव हे डिस्चार्ज देण्यास पात्र आहेत, आणि ते त्यांची काळजी स्वत: घेऊ शकतात, असे म्हटले आहे. जानेवारी महिन्यात त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा तळोजा कारागृहात पाठवायचे की हैदराबादमधील घरात पाठवायचे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत, याकडे राव यांच्या वकिलांनी लक्ष वेधले.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला की, आजार असणारे अनेक कैदी राज्याच्या कारागृहात आहेत. ते कारागृहात असताना राज्य सरकारच्या वतीने त्यांच्यावर उपचार केले जातात. या कवींच्या कुटुंबियांनी त्यांची कारागृहाच्या प्रिझन वॉर्डमध्ये भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या हैदराबाद येथील घरी नेण्यसाठी करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात यावा.

न्यायालयाने जामीनाच्या काळात राव यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यकक्षेत मुंबईत राहण्याचे आदेश दिले आहेत. राव यांच्या अस्वस्थ प्रकृतीमुळे उच्च न्यायलयाने नोव्हेंबर 2020 मध्ये राज्य सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावेळी राव यांना करोनाची बाधा झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.