पुणे, दि.23 -भुगाव-भुकुम (ता.मुळशी) या दोन गावांमध्ये दहशत माजविण्यासाठी काही समाजकंटकांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. वाढती गुन्हेगारी आणि दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात भुगाव-भुकुम ग्रामस्थांनी एकजुटीने लढण्याचा निर्णय रविवारी घेतला. तसेच संबधित आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून याबाबतचे निवेदन ग्रामीण पोलीस अधिक्षकांना देण्यात येणार आहे.
भुगाव येथील शंभू महादेव मंदिरामध्ये दोन्ही गावांतील नागरिकांची रविवारी बैठक झाली. ही दोन्ही गावे पुणे शहरालगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी काही प्रवृत्तींकडून पैसे उकळणे, दमदाटी, चोरी, वाहने जाळणे असे प्रकार घडले आहेत.
केवळ दहशत पसरविण्यासाठी एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या सर्व घटनांविरोधात वेळीच आवाज उठविला नाही, तर पुढे या समाजकंटकांकडून मोठे प्रकार घडतील. गुन्हेगारी वाढेल. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी अशा प्रवृत्तींविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी नागरिकांनी आपले म्हणणे मांडत घडलेल्या घटनेविरोधात रोष व्यक्त केला. तसेच यापूर्वी घडलेल्या घटनांचा पाढाच वाचून दाखविला.
या दोन्ही गावांत लोकसंख्या मोठी आहे. अनेक शाळा, महाविद्यालये आणि कंपन्या येथे आहेत. उद्योग-व्यवसाय या ठिकाणी वाढत आहे. यामुळे रात्री-अपरात्री ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही गावांत शांतता असणे आवश्यक आहे.
नागरिकांना येथे सुरक्षित वाटणेही महत्त्वाचे आहे. राहण्यायोग्य गाव आणि नागरिकांची सुरक्षितता कायम रहावी. यासाठी या सर्व वाईट प्रवृत्तींविरोधात वेळीच कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबैठकीस राजेंद्र हगवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम इंगवले, भुगावच्या सरपंच वनिता तांगडे, भुकुमच्या गौरी भरतवंश यांच्यासह उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, आजी -माजी तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीतील मुद्दे
पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी
रस्त्याच्या कडेला मद्य प्राशन करणाऱ्यांवर कारवाई करावी
पोलीस चौकी तातडीने उभारण्यात यावी