परखंदीत बैठक; विराज शिंदे यांच्याकडे धुरा सोपविणार
मेणवली – भुईंज, बोपेगाव या दोन गावांभोवतीच पिढ्यान्पिढ्या फिरणारं वाई तालुक्यातील सत्तेच्या राजकारणाचं समीकरण बदलण्यासाठी व घराणेशाहीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी वाई विधानसभा निवडणुकीची धुरा वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील युवा नेते विराज शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्याचा एकमुखी एल्गार पंचायत समितीच्या शेंदुरजणे गणासह वाई मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीत मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तिसऱ्या शक्तीच्या उभारणीचा प्रयत्न केला असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वाई तालुक्यातील सत्तेच्या राजकारणात काही ठराविक घराण्याची मक्तेदारी झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी करून तालुक्यातील विविध संस्थाची सत्तास्थाने बळकावून नेत्यांची वाढलेली हुक़ूमशाही कायमची मोडीत काढण्यासाठी विराज शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शेंदुरजणे गणातील 22 गावांतील व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी घराणेशाहीच्याविरुद्ध बंडाचे निशान फडकवले. वाईचे सत्तेचे राजकारण गेली चाळीस वर्षे भुईंज व बोपेगावपुरते मर्यादित झाल्याने नूरा कुस्तीचा वास कार्यकर्त्याना येऊ लागला आहे.
वाई मतदारसंघातील विविध सामाजिक व सहकारी संस्था डबघाईला येऊनही दोन्ही राजकीय घराणी जनतेशी प्रतारणा करत असल्याचा आरोप घराण्याचे नाव न घेता कार्यकर्त्यानी बैठकीत केला. काही काळ सत्तेवर आरूढ असलेल्या बावधन गावाचे अस्तित्वसुद्धा कै. मदनराव पिसाळ यांच्यानंतर संपवण्याचं काम या दोन गावांनी केल्याची खंत काही प्रमुख कार्यकर्त्यानी यावेळी बोलून दाखवली. एका घराने गावागावांत, भावाभावांत, भावकीत भांडणे लावायची तर दुसऱ्या घराने गोडगोड बोलून लोकांची दिशाभूल करत पाच वर्षातूनन एकदाच दर्शन देऊन स्वतःसाठी सत्ता भोगायची, प्रामाणिक कार्यकर्त्याला मात्र फक्त आश्वासनांची खैरात वाटायची, या सगळ्या गोष्टींना वाई मतदारसंघातील कार्यकर्ते वैतागले आहेत. त्यामुळेच नवीन चेहऱ्याच्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विराज शिंदे या युवा नेत्याची एकमुखाने निवड करण्यात आली. येणाऱ्या काळात वाई मतदारसंघातील सत्तेच्या सारीपाटातील ठराविक घराणेशाही राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विराज शिंदे घेतील तो राजकीय निर्णय मान्य करून शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. वाई तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यानी तिसऱ्या शक्तीची उभारणी केल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातील राजकीय गणिताची समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे निवडणुकीच्या तोंडावर कोणते “धनुष्यबाण’ उचलणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.