एल्गार प्रकरण : एनआयएकडून तपासाची कागदपत्रे हाती घेण्याच्या हालचाली सुरू

तपास अधिकारी पोलीस आयुक्‍तालयात दाखल

पुणे – राज्य सरकार आणि न्यायालयाने एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर एनआयएने तपास आणि तपासासंदर्भात कागदपत्रे घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने एनआयएचे एल्गार प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे आणि त्यांचे पथक सोमवारी (दि. 17) पोलीस आयुक्‍तालयात दाखल झाले.

खलाटे यांनी पुणे पोलिसांचे एल्गार प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार यांच्याकडून खटल्यासंबंधी महत्त्वाची माहिती घेतली. सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून एनआयएच्या पथकाकडून लहानसहान विषयांवर माहिती घेणे सुरू होते. या प्रकरणात जप्त केलेला डाटा 25 टीबीपेक्षा जास्त असून हा डाटा आणि त्यासंबंधीची कागदपत्रे समजून मुंबई येथे वर्ग करण्यासाठी किमान तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एल्गार प्रकरणाचा तपास आणि कागदपत्रे एनआयएकडे सोपविण्यास राज्य सरकार तयार नसताना गुरुवारी (दि.13) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक तपास एनआयएकडे सोपविला. त्यानुसार एनआयएकडे तपास सोपविण्यास हरकत नसल्याचे पत्र पुणे पोलिसांनी शुक्रवारी (दि.14) न्यायालयात सादर केल्यानंतर दुपारी न्यायालयानेही या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, मुद्देमाल एनआयएकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. येथून पुढे हे प्रकरण मुंबई येथील एनआयएच्या न्यायालयात चालविण्यास परवानगी दिली.

पुणे न्यायालयातील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील आणि पुणे पोलिसांचा सरकारी पक्ष यांनी एल्गार प्रकरणाची सुनावणी एनआयएकडे वर्ग करण्यास विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत एनआयएने केलेला अर्ज मंजूर केला. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल 28 फेब्रुवारीला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.