अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज

पुणे – अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी 63 हजार 566 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत आहे. आता विद्यार्थ्यांचे पहिल्या गुणवत्ता यादीकडे लक्ष लागले आहे.

अकरावी प्रवेशासाठी भाग-1 आणि भाग-2 असे अर्ज करणे आवश्‍यक होते. त्यानुसार महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या 55 हजार 716 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, तर उर्वरित 7 हजार 850 अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. शाखानिहाय अर्जाची संख्या अकरावी प्रवेश समितीने आज जाहीर केली आहे. या अर्जात मुलांची संख्या 32 हजार 994, तर मुलींची संख्या 30 हजार 572 एवढी आहे. तसेच नव्याने प्रवर्ग निर्माण करण्यात आलेल्या “एसईबीसी’ प्रवर्गातून 2 हजार 162 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून 391 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली.

पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना तीन दिवसांत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश कन्फर्म करणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमाच्या पहिल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, त्यांना कसल्याही परिस्थितीत प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.