अकरावी प्रवेश प्रक्रिया आजपासून

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

पुणे -इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांनंतर पुन्हा गुरुवारपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. “एसईबीसी’ प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दि.9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली. यामुळे अकरावीसह आयटीआय, डी.एल.एड., पॉलिटेक्‍निक आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला होता.

विद्यार्थी, पालक, संघटनांकडून प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत महाधिवक्‍तांकडून कायदेशीर अभिप्राय मागविले होते. ते विचारात घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याबाबतचे आदेशही सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव र. अं. खडसे यांनी दिले. हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहणार आहे.

पुढील प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी एसईबीसीच्या प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले असतील परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातूनच प्रवेश देण्यात यावे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक

26 नोव्हेंबर – प्रवेशासाठी रिक्‍त पदे दर्शविणे.

26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर – यापूर्वी एसईबीसी, प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इतर लागू होणारा प्रवर्ग निवडण्याची सुविधा उपलब्ध, अर्ज भाग 1 व 2 मध्ये बदल करता येणार, नवीन विद्यार्थी अर्जाचा भाग 1 व 2 भरू शकतील, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटांतर्गत प्रवेशासाठी महाविद्यालयांना अर्ज मागविता येणार आहे. 

2 डिसेंबर – प्रवेश अर्जाच्या भाग 1 ची मार्गदर्शन केंद्र व शाळांसाठी पडताळणी करणे.
3 डिसेंबर – पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी अंतिम करणे.

5 डिसेंबर – अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे, विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविणे, प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये दर्शविणे, कटऑफ संकेतस्थळावर दर्शविणे.

5 ते 9 डिसेंबर – विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे, घेतलेला प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारता येणे, व्यवस्थापन कोटांतर्गत रिक्‍त जागा प्रत्यार्पित करणे, नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग 1 भरणे सुरू होईल.

9 डिसेंबर – झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदविणे.
10 डिसेंबर – प्रवेशाची नियमित तिसऱ्या फेरीसाठी रिक्‍त जागांचा तपशील जाहीर करणे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.