अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर

पहिल्या फेरीत मिळाला 40 हजार 93 विद्यार्थ्यांना प्रवेश

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 40 हजार 93 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यातही विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. या शाखेतून 18 हजार 643 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. राज्यमंडळाच्या सर्वाधिक 34 हजार 700 विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळालेला आहे.

पुणे विभागात 304 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 6 हजार 972 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या जागांसाठी 98 हजार 946 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यात नियमित प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी 73 हजार 685 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 68 हजार 72 अर्ज पात्र ठरविण्यात आले. प्रथम पसंतीक्रम क्रमांक मिळालेल्या 19 हजार 575 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 28 हजार 59 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेला नाही.

गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असल्यास लॉग-इनमध्ये जाऊन “प्रोसिड फॉर ऍडमिशन’ करणे आवश्यक आहे. संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश देण्यासाठी 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 अशी मुदत देण्यात आलेली आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

ज्यांना प्रवेश घ्यावयाचा नाही त्यांनी ही प्रक्रिया करू नये. संबंधित महाविद्यालयांनाही लॉग-इनमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पसंतीक्रम योग्य नसणे, कट ऑफमध्ये बसत नसणे यामुळे काही विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश झालेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश झालेले नाहीत त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये संधी मिळणार आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.