पुणे – इयत्ता अकरावीच्या “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) अंतर्गत दुसऱ्या प्रवेश फेरींतर्गत काही अपरिहार्य कारणास्तव प्रवेश घेता न आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अकरावी प्रवेशासाठी 304 कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांत 1 लाख 7 हजार 90 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी एकूण 1 लाख 3 हजार 116 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यातील 71 हजार 380 जणांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशाच्या 35 हजार 710 जागा अद्यापही रिक्त आहेत.
इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत “एफसीएफएस’ची दुसरी फेरी सध्या सुरू आहे. या प्रवेशासाठी शनिवारपर्यंतच (दि.13) मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळावी यासाठी शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या कालावधीत प्रवेश मिळालेला विद्यार्थ्यांनी संबंधीत महाविद्यालयांत वेळेत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रवेश रद्द करण्याची प्रक्रियाही विद्यार्थ्यांना पूर्ण करता येणार आहे. प्रवेशाच्या मुदतवाढीच्या सूचना माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी जाहीर केल्या आहेत.