वॉशिंग्टन – इराणने गेल्या आठवड्यात इराकमधील लष्करी तळावर जो हल्ला केला त्यात अमेरिकेचे 11 जवान जखमी झाले. या हल्ल्यात अमेरिकेचा एकही जवान ठार झाला नसल्याचे अमेरिकेने म्हटले होते. पण आता मात्र त्यांनी या हल्ल्यात आमचे अकरा जवान जखमी झाल्याचे नमूद केले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी ही माहिती दिली.
इराणने जेव्हा हा हल्ला केला त्यावेळी तेथे अमेरिकेचे 1500 जवान तैनात होते. पण त्यांच्या गुप्तचर विभागाने या सैनिकांना वेळीच या हल्ल्याविषयी सावध केल्याने त्यांना तातडीने जवळच्याच बंकर मध्ये हलवण्यात आले होते त्यामुळे अमेरिकन लष्कराची मोठी जीवित हानी टळली. मात्र या हल्ल्यात अमेरिकेच्या लष्करी सामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्याची कबुलीही अमेरिकेन आज दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आमचे अकरा जवान जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात वैद्यकीय कारणासाठी हलवण्यात आले असल्याचे नमूद केले आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करी सूत्रांनी या जखमी जवानांपैकी किती जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत त्याचा तपशील दिलेला नाही.