Nagpur Corona | नागपूरात कोविड रुग्णांसाठी रेल्वेचे अकरा कोच

मुंबई, दि. 3 – नागपूर शहरातील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेतर्फे नागपूर महापालिकेला रेल्वेचे 11 डबे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी देण्यात आले आहेत. 11 नॉनएसी कोचेस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 1 स्वतंत्र कोच असे एकूण बारा डबे महापालिकेला देण्यात आले आहेत. ते अजनीच्या स्थानकावर उभे आहेत.

यातील प्रत्येक डब्यात 16 बेड्‌सची व्यवस्था होऊ शकणार आहे. त्यामुळे 176 रुग्णांची या रेल्वे डब्यातील कोविड सेंटरमध्ये सोय होऊ शकेल. जे कमी बाधित रुग्ण आहेत, त्यांना या रेल्वे कोविड केंद्रात हलवण्यात येणार आहे. या कोचच्या शेजारी सुसज्ज रुग्णवाहिकाही तयार ठेवण्यात येत आहे.

प्रत्येक कोचमध्ये दक्षतेचा उपाय म्हणून दोन ऑक्‍सिजन सिलिंडरही ठेवण्यात आले आहेत. नागपूर महापालिकेने येथील सोयीसाठी वैद्यकीय स्टाफ पुरवला आहे. नागपूर शहरात रविवारी करोनाचे नवे 5 हजार 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या 4 लाख 19 हजार 370 इतकी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.