कर्जत – कर्जतचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी कर्जत तालुक्यातील भीमा नदीपात्रात धडक कारवाई करत अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या अकरा बोटी जिलेटीनच्या सहाय्याने फोडल्या. या कारवाईत वाळू तस्करांचे सुमारे ऐंशी लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे सिद्धटेक, भांबोरा, दुधोडी, खेड भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू होता. अखेर पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलत बोटी फोडण्याची कारवाई केल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांना मिळाली. सकाळी साडेआठ वाजता ही माहिती समजताच त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच कर्जत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहिती देत कारवाईचे नियोजन केले.यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना माहिती दिली. भांबोरा-सिद्धटेकचे मंडलाधिकारी कुंदेकर व कर्मचाऱ्यांना कारवाईत सामील केले.
कारवाईसाठी अजनुज येथून स्पीड बोटी मागवण्यात आल्या. या धडक कारवाईत जिलेटिनच्या सहाय्याने नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या अकरा बोटी स्फोट करून नष्ट करण्यात आल्या. यामध्ये सुमारे ऐंशी लाखांचे नुकसान झाले. या कारवाईत मंडलाधिकारी कुंदेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र जाधव, उत्तम राऊत, इरफान शेख, दादा टाके, किरण बोराडे, आदित्य बेलेकर, प्रताप देवकाते आदी सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक इशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी कारवाई केली.