इलेव्हेटिंग फ्रंट कॅमेऱ्याचे फॅड

टेक्‍नॉलॉजीच्या जगामध्ये प्रत्येक क्षणी अगणित बदल होत असून आपल्या स्मॉल आणि कॉम्पॅक्‍ट डिझाईनमुळे जगभरातील टेक्‍नोसॅव्हींच्या गळ्यातील ताईत बनलेला स्मार्टफोन देखील याला अपवाद नाहीये. आपल्या स्मार्टफोनमध्ये इतरांपेक्षा काहीतरी नवीन फिचर असावं अशी मागणी जगभरामधून असल्याने स्मार्टफोन कंपन्या देखील आपल्या नव्या स्मार्टफोनसोबत काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असतात. सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये काही कंपन्या तर अशाही आहेत ज्या आपल्या ग्राहकांच्या फीडबॅक तथा मागण्यांनुसार स्मार्टफोन तयार करीत आहेत. स्मार्टफोनच्या दुनियेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून डिझाईनच्या बाबतीत आमूलाग्र बदल झाले आहेत.

फुल व्ह्यूव डिस्प्ले, नॉच डिस्प्ले, बेझललेस डिस्प्ले या प्रकारचे डिस्प्ले सध्या स्मार्टफोन विश्‍वामध्ये ट्रेंडिंग असून अशा स्मार्टफोन्सना विशेष मागणी देखील आहे. मात्र अशा प्रकारच्या डिस्प्ले मांडणीमधून स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये आणखीन एक विशेष बदल झाला असून तो बदल फ्रंट कॅमेऱ्याच्या बाबतीत आहे. त्याचं झालं असं की फुल व्ह्यूव डिस्प्ले, नॉच डिस्प्ले, बेझललेस डिस्प्ले या प्रकारचे डिस्प्ले सध्या स्मार्टफोन विश्‍वामध्ये भलतेच गाजले असल्याने जनरली स्मार्टफोनच्या पुढच्या बाजूस असणाऱ्या बिचाऱ्या सेल्फी कॅमेऱ्याला जागाच उरली नाही. आता अशावेळी सेल्फीलव्हर्सचा जीव की प्राण असणारा फ्रंट कॅमेरा लावायचा तरी कुठं असा प्रश्‍न उपस्थित झाला आणि त्यातूनच निर्मिती झाली इलेव्हेटिंग फ्रंट कॅमेऱ्याची!

गतवर्षी स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या एका कंपनीने पहिल्यांदा इलेव्हेटिंग कॅमेऱ्याची कन्सेप्ट मांडल्यानंतर त्याला जगभरातील स्मार्टफोन प्रेमींनी भरघोस प्रतिसाद दिला होता. डिस्प्लेच्या वरच्या बाजूस असणारा फ्रंट कॅमेरा आणि सेन्सर्समुळे स्मार्टफोनच्या पुढीलबाजूस संपूर्ण डिस्प्ले बसवणे स्मार्टफोन मेकर्सना अवघड जात होते. मात्र अशातच आता स्मार्टफोनमध्ये इलेव्हेटिंग फ्रंट कॅमेरा टेक्‍नॉलॉजीमुळे पुढील बाजूस संपूर्ण डिस्प्ले बसवणं शक्‍य झालं आहे. या वर्षी सादर करण्यात येणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये ही टेक्‍नॉलॉजी मोठ्या प्रमाणात वापरली जाणार आहे. बेसिकली इलेव्हेटिंग फ्रंट कॅमेरा टेक्‍नॉलॉजीमध्ये फ्रंट कॅमेरा हा स्मार्टफोनच्या बॉडीमध्ये फिट केला जाणार असून वापरकर्त्याने फ्रंट कॅमेरा उघडताच हा कॅमेरा ऑटोमॅटिकली बाहेर येणार आहे तसेच कॅमेरा बंद केल्यानंतर पुन्हा आपल्या जागी जाणार आहे. इलेव्हेटिंगचे काम व्यवस्थित पार पडावे यासाठी एक खास मोटरदेखील वापरण्यात येणार असल्याने हा इलेव्हेटिंग फ्रंट कॅमेरा टिकाऊदेखील असेल.

– प्रशांत शिंदे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.