मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघात महावितरण कंपनीने भारनियमन शेतक-यांच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतीसाठी देण्यात येणारा विद्युत पुरवठा दिवसा सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत देणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांना पत्राद्वारे केली.
आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघात महावितरण कंपनीने भारनियमन करताना वेळापत्रकात केलेला बदल शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत त्रासदायक ठरत असल्याच्या प्रतिक्रीया शेतक-यांकडून येत आहेत.
वेळापत्रकानुसार विद्युत मोटारीसाठी असणारा थ्री-फेजचा पुरवठा रात्री देण्यात येत आहे. परिसरात कांदा लागवडीचे काम जोरात सुरू आहे, रात्री कांदा लागवड करता येत नाही. या परिसरात बिबट्याचा मोठया प्रमाणात वावर असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
यापुर्व कालावधीत शेतक-यांवर बिबट्याचा हल्ला होवून अनेक लोक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना ताज्या आहेत. यास्तव विद्युत मोटारीसाठी असणारा थ्री फेजचा विद्युत पुरवठा रात्रीऐवजी दिवसा देण्याबाबत शेतक-यांची आग्रही मागणी आहे.
तरी शेतकर्यांच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतीसाठी देण्यात येणारा विद्युत पुरवठा सकाळी 10 ते सायं. 5 वा. यां वेळेत देणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अशी सूचना सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.