वीज महावितरणचे दीड कोटीचे नुकसान

पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खांबांची पडझड; युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू

नगर – झालेल्या वादळी पावसामुळे वीज महावितरण कंपनीचे तब्बल दीड कोटीचे नुकसान झाले आहे. वीजेचे खांब उनमळून पडल्याने विद्युत वाहक तारा देखील तुडल्या असून त्याचा परिणाम सध्या जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. नगर शहरात तब्बल तीन ते चार तास वीजपुरवठा केवळ दुरुस्ती करण्यासाठी खंडित ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागात देखील तीच स्थिती असल्याने नागरीक वैतागले आहेत. या वीज महावितरणकडून सध्या युद्धपातळीवर या दुरुस्तीचे कामे सुरू असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली.

नगर शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि.10) रोजी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्याने व विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक तालुक्‍यातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. जोराच्या वाऱ्यात महावितरण विभागाचे नगर शहरात 27 मोठे खांब तर 440 व्होल्टचे 30 ते 35 खांब पडले आहेत. भिंगारमध्ये तब्बल 18 खांब वाकले तर काही पडले आहेत.

त्यासह आजअखेर जिल्ह्यात 1 हजारांहुन अधिक खांब पडले आहेत. तर अनेक घरांच्या सर्व्हिस केबल तुटल्या होत्या. त्याचे अद्यापही काम सुरु आहे. तसेच जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होत आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीज मंडळाकडून विद्युत तारांना अडथळे निर्माण होत असलेल्या झाडांच्या फांद्या काढणे आवश्‍यक होते. परंतु हे काम झाले नाही. त्यामुळे आज झाडासह विजेचे खांब उनमळून पडले आहेत. त्यात तारा देखील तुटून पडल्या आहेत.

मान्सून सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने महावितरण विभागास दिले होते. त्यानुसार वरवर कामे या विभागाकडून करण्यात आले. त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. मात्र, काही झाडे विद्युत वाहक तारांवर पडल्याने मोठे नुकसान झाले. वीज मंडळाचा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्‍यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघातामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. यावर्षी पहिल्याच पावसात मोठमोठे वृक्ष तसेच झाडांच्या मोठ्या फांद्या पडून वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.