चार मेगावॉट वीज नॅशनल ग्रीडला जोडली जाणार
पुणे – मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या टेमघर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरील वीजनिर्मिती प्रकल्प यंदा कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्षात चार मेगावॉट एवढ्या वीजनिर्मितीला सुरुवात झाली आहे.
टेमघर धरणाची क्षमता 3.71 टीएमसी आहे. पाणीगळतीमुळे दुरुस्तीचे काम सुरू होते. यंदा पहिल्यांदाच टेमघर धरणात 100 टक्के पाणीसाठा करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार खडकवासला धरणात पाणी सोडले जाते. या पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बीओटीवर निविदा मागविण्यात आल्या होत्या.
तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार मागील वर्षी हे काम पूर्ण झाले. त्यानंतर या प्रकल्पाची चाचणीदेखील घेण्यात आली. पानशेत आणि वरसगाव धरणांच्या उभारणीनंतर पॉवर हाऊस बांधण्यात आले. सांडव्यातून पाणी सोडताना विद्युतनिर्मिती केली जाते. त्याच धर्तीवर टेमघरमधून वीजनिर्मिती केली जात आहे. धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती केंद्र आहे. तेथे 1 मेगावॅटचे चार संच उभारण्यात येत असून तेथून वीजनिर्मिती होत आहे. ही वीज ठेकेदार कंपनीकडून नॅशनल ग्रीडला जोडली जात आहे. पावसाळ्यात आणि त्यानंतरही या धरणातून जेव्हा जेव्हा पाणी सोडण्यात येणार आहे, त्यावेळेस त्यातून वीजनिर्मिती सुरू राहणार आहे.
टेमघर जलविद्युत प्रकल्पातून पहिल्यांदाच वीजनिर्मिती सुरू झाली आहे. यामुळे जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीस हातभार लागणार आहे. या प्रकल्पातून वर्षातील सुमारे 180 दिवस वीज निर्मिती होणार आहे.
– प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ