मोजक्‍या कर्मचाऱ्यांवरच वीज वितरणचा गाडा

महाबळेश्‍वरमधील परिस्थिती : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामात अडथळे

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वरच्या शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीजेच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून वीजवितरणविरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे. मात्र, येथील वीज वितरणचा कारभार हा चार-चौंघावरच सुरु असल्याने मोजक्‍या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामात असंख्य अडथळे येत असल्याने संबंधितांनी तात्काळ याठिकाणी कामगारांची उपलब्धता करुन देण्याची मागणी होत आहे.

महाबळेश्‍वर येथील महावितरण कार्यालयात ग्रामीण व अर्बन भागासाठी असणारी कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाबळेश्‍वर ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण 35 कर्मचाऱ्यांची गरज असताना महाबळेश्‍वर महावितरणाकडे ग्रामीण भागासाठी फक्त 3 तर शहरी भागासाठी एकच वायरमन असल्याने खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महावितरणाच्या कार्यालयातील फोन उचलण्यासाठी ऑपरेटरच नसल्यामुळे कार्यालयातील फोन फक्त वाजतच असतो. तक्रार देण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गेले असता कार्यालयात कोणीच नसते अशी बिकट परिस्थिती महावितरणाच्या कार्यालयात दिसते. एकूण 35 कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असताना फक्त चार वायरमन व सहा टेंडरवरची मुले व एक इंजिनिअर महाबळेश्‍वर अर्बन व ग्रामीण भागासाठी तुटपुंजे ठरत आहेत. कार्यक्षम वायरमनची भरती झाली नाही तर महाबळेश्‍वर पावसाळ्यात अंधारातच राहणार हे नक्की. वरिष्ठ पातळीवर वारंवार कर्मचाऱ्यांची मागणी करूनसुद्धा महाबळेश्‍वर महावितरणाला कार्यक्षम कर्मचारी पुरवले जात नसल्यामुळे महाबळेश्‍वर महावितरणाच्या अडचणीत वाढ होत आहे.

महाबळेश्‍वर अर्बन भागासाठी एकच वायरमन असल्यामुळे महाबळेश्‍वर शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तासन्‌तास लागत आहेत. एक अभियंता व एक परमिटधारक वायरमन यांच्यावरच महाबळेश्‍वर शहराचा भार असल्यामुळे शहरवासियांना तासन्‌तास लाईटच्या प्रतीक्षेत काम बंद करून बसावे लागत आहे. जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा व कोलमडून पडणारी झाडे महावितरणची डोकेदुखी झालेली आहे. पावसाच्या सुरुवातीस विद्युत पोलच्या तारा तुटून पडण्याचे प्रमाण वाढले असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फाद्या विद्युत तारांना चिटकून फेज ट्रीप होत आहेत.

विद्युत तारांना चिटकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी वनविभागाकडून महावितरणाची अडवणूक होत असल्या कारणाने महावितरणाच्या अडचणीत वाढ होत आहे. महाबळेश्‍वरातील क्‍लायमेट, नैसर्गिक आपत्ती व महावितरणाची तुटपुंजी कर्मचारी संख्या यामुळे महाबळेश्‍वरवासियांना अंधारातच रहावे लागणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. महावितरणाची वरिष्ठ कार्यकारिणी महाबळेश्‍वर महावितरणाच्या कार्यपद्धतीत सुलभता आणण्यासाठी काही ठोस पावले उचलणार का? का चलती का नाम गाडी अशा पद्धतीने महावितरणाचा कारभार रेटत रेटत पुढे नेणार, असा प्रश्‍न उभा राहत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.