थकबाकी अंगलट : 19 हजार जणांनी भरले 22 कोटी रुपये
पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह पुणे ग्रामीण मंडलमधील वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार 9 हजार 520 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर 18 हजार 990 थकबाकीदारांनी 22 कोटी 91 लाख रुपयांच्या वीज बिलाचा भरणा केला आहे.
महावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमेचे थकबाकीदार असणाऱ्या वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरात पुणे शहरातील वाणिज्यिक व औद्योगिक 5 हजार 281 ग्राहकांचा वीजपुरवठा 5 कोटी 29 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. तर 6 हजार 648 थकबाकीदारांनी 8 कोटी 55 लाख रुपयांचा भरणा केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 2 हजार 317 थकबाकीदारांचा 2 कोटी 56 लाखांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर 6 हजार 641 थकबाकीदारांनी 5 कोटी 74 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
तर, मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील 1 हजार 922 ग्राहकांचा 2 कोटी 42 लाखांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर 5 हजार 701 ग्राहकांनी 8 कोटी 62 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.