पुणे – जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत तब्बल 1 हजार 134 कोटींनी वाढ झाली आहे.
सद्य:स्थितीत 17 लाख 77 हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह इतर ग्राहकांकडे 4 हजार 324 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या मोठ्या थकबाकीमुळे महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
करोना संकटापूर्वी मार्चपर्यंत पुणे जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील 12 लाख 2 हजार वीजग्राहकांकडे 3 हजार 190 कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र, मार्चपासून करोनाचे संकट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन काळात व त्यानंतर वीजबिलांचा भरणा कमी होत गेल्याने महावितरणच्या आर्थिक संकटाला सुरवात झाली.
मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत 5 लाख 72 हजारांनी वाढ झाली आहे. थकबाकीची रक्कमदेखील तब्बल 644 कोटी 37 लाखांनी वाढली आहे.