पणजी – इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. चार्जिंग वेगात व्हावे याकरिता फास्ट चार्जर्स विकसित करण्यात येत आहे. या विषयावर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संशोधन करत असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी दिली.
एआरएआयने या संदर्भातील प्रोटोटाइप अगोदरच विकसित केले आहे. त्यावर पुढील संशोधन चालू असल्याचे पांडे यांनी या विषयावरील सर्व संबंधिताच्या गोलमेज परिषदेत सांगितले. इलेक्ट्रिक वाहन लोकप्रिय होण्यामध्ये काय अडथळे आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, या वाहनांचे फास्ट चार्जिंग होत नसल्यामुळे ग्राहक ही वाहने खरेदी करण्यास पुढाकार घेत नाहीत. मात्र या संदर्भात संशोधन करून प्रोटोटाईप विकसित केले आहे. डिसेंबर 2022 पर्यंत हे फास्ट चार्जर उपलब्ध होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारतातील ग्राहकांना हे फास्ट चार्जर डिसेंबर 2022 पासून उपलब्ध होतील. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सूचित केले. फास्ट चार्जरमुळे टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि कार किती वेगात चार्ज होतील असे विचारले असता या संदर्भातील तपशील अद्याप उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
जर भारतात पुरेशा प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय झाली तर 2030 पर्यंत पेट्रोलियम पदार्थावरील आयातीचा खर्च 20 लाख कोटी रुपयांनी वाचेला असे त्यांनी सांगितले. भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती वाढल्यास देशांतर्गत वापराबरोबरच निर्यातीलाही आगामी काळात वाव असल्याचे ते म्हणाले.
पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन
चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा देशभर निर्माण झाल्याशिवाय इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय होणार नाहीत ही बाब ध्यानात घेऊन अवजड उद्योग मंत्रालय पेट्रोलियम मंत्रालयाच्या संपर्कात आहे. देशातील किमान 22,000 पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. देशामध्ये सध्या 70 हजार इतके पेट्रोल पंप आहेत.
त्यापैकी कोणत्या पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन उभारता येईल या संदर्भात अभ्यास करण्यात येत आहे. महामार्गावर 25 किलोमीटरच्या आत आणि शहरात तीन किलोमीटरच्या आत अशी चार्जिंग स्टेशन उभारली जाणे अपेक्षित आहे.