नागपूर – भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र होणार आहे. लिथियमचे जगातील सुमारे 6 टक्के साठे हे जम्मूमध्ये सापडल्याने हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात 60 कोटी इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरण्यात येईल. लिथियम आयन बॅटरीची किंमत किंमत कमी होईल अशी माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
ते इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचे व्यवस्थापन या विषयावर एका कार्यशाळेला संबोधित करत होते. त्यांनी सांगितले की,गेल्या 3 वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांमध्ये 30 आग लागल्याच्या घटना घडल्या असून यामुळे ई व्हेईकलच्या बाजार व्यवस्थेवर परिणाम होत होता. डीआरडीओ तसेच आयआयटीने सुरक्षा मानांकनाने बॅटरी सुरक्षा सुनिश्चित केली आहे. इलेक्ट्रिक बसेस मध्ये फायर डिटेक्शन अलार्म अनिवार्य केला आहे.
ईव्ही बॅटरी वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातील नियम केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 2022 ला आखले असून या संदर्भात बॅटरी रिकव्हरी आणि रिसायकलिंग व्यवस्थापनाकरिता बॅटरी उत्पादकांवर हे नियम बंधनकारक केले आहेत. हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन असून यां इंधनाच्या वापराने किफायतशीर प्रदूषण मुक्त असे इंधन उपलब्ध होऊन यामुळे सुरक्षित परिवहन सुनिश्चित होणार आहे. शेतातील तणस, परळी ऊसाची मळी यापासून बायो सीएनजीच्या निर्मितीचे 400 प्रकल्प मंजूर झाले आहेत.
सुमारे 30 लाख इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत असून 2023 – 24 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये 45% वाढ झाली असून 2024 मध्ये एकूण बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण हे 6.4% आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये 56% विक्रीचे प्रमाण हे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये 400 हून अधिक जास्त स्टार्टअप निर्माण झाले असून 2025 पर्यंत हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील प्रमाण हे 8 टक्क्यांपेक्षा जास्त होणार आहे.